Ad will apear here
Next
चौथी, पाचवी नव्हे; भाषा एकच...पैशाची!


गुगल असिस्टंट आता हिंदी व मराठीसह आठ भाषांमध्ये वापरता येणार असल्याचे गुगलने नुकतेच जाहीर केले. अॅलेक्सा हे आपले उपकरण हिंदी व हिंग्लिशमध्ये संभाषण करू शकेल, असे अॅमेझॉनने जाहीर केले. भारताची बाजारपेठ काबीज करायची असेल, तर बाजारपेठेची भाषा बोलायला पाहिजे, हे इंगित या कंपन्यांना पुरते कळून चुकले आहे.
...........
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा हंगाम सुरू आहे आणि त्यात मराठीचा मुद्दा येणार नाही, असे कधी होत नाही. त्यानुसार यंदाच्या निवडणूक प्रचारातही मराठी भाषेचा मुद्दा आला. भारतीय जनता पक्ष व शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस अशा सर्वच पक्षांनी मराठीच्या हिताची आश्वासने दिली आहेत. त्यात मराठीसाठी स्वतंत्र विद्यापीठ आणि मराठी भाषेसाठी विशेष सवलती असे अनेक वायदे आहेत. दुसरीकडे, मराठीसाठी लढणारा पक्ष म्हणून ओळख असणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही आपल्या लौकिकाला साजेशी आठवण करून दिली.

‘तुम्ही वापरत असलेल्या मोबाइल फोनच्या कंपन्यांचे मेसेज आणि कॉल यापूर्वी केवळ हिंदी व इंग्रजी भाषेत येत असत; मात्र ‘मनसे’च्या दणक्यामुळे सर्व मोबाइल कंपन्यांत मराठी सुरू झाले. हे त्रिभाषा सूत्र बस झाले. आता मुंबईत परत चौथी भाषा आणण्याचा प्रयत्न केला तर परत तसाच बांबू बसेल,’ असे वक्तव्य राज ठाकरेंनी मुंबईतील प्रचारसभेत केले.

ठाकरे यांच्या बोलण्यात तथ्य असेलही. मोबाइल कंपन्यांच्या सेवा सुरू झाल्या, तेव्हा त्यांचे संदेश केवळ इंग्रजी आणि हिंदी भाषेत होते ही गोष्ट खरी आहे. हे संदेश मराठी, तसेच अन्य प्रादेशिक भाषांमध्ये यावे यासाठी अनेकांनी लढा दिला. सांघिक, तसेच वैयक्तिक पातळीवर अनेकांनी या कंपन्यांकडे आग्रह धरला म्हणून त्यांना या भाषांचा अंगीकार करावा लागला. (त्यांना प्रादेशिक भाषा म्हणून चुकीचे नामाभिधान देण्यात आले. खरे तर भारतीय भाषा हे त्याचे सर्वांत समर्पक वर्णन आहे.) अर्थात मोबाइल कंपन्यांची सेवा भारतात सुरू होऊन अडीच दशके उलटली आहेत आणि आता परिस्थिती किती तरी वेगळी झाली आहे. फक्त मोबाइल कंपन्याच कशाला, तर मोबाइलवरील विविध सेवाही आपल्या भाषांमध्ये हात जोडून उभ्या आहेत. त्यामागे कारण कुठलीही दंडशक्ती नसून, दामशक्ती आहे.

उदाहरणादाखल जगातील दोन बलाढ्य कंपन्यांच्या गेल्या महिन्यातील घोषणा पाहा. स्मार्ट स्पीकर, स्मार्टफोन आणि संगणकावर वापरला जाणारा गुगल असिस्टंट आता हिंदी व मराठीसह आठ भाषांमध्ये वापरता येईल, असे इंटरनेटवर अधिराज्य गाजविणाऱ्या गुगलने जाहीर केले. गुगल असिस्टंटमध्ये आपल्या या भाषांचा वापर करण्याची सोय याआधीही होती. परंतु त्यासाठी तुमच्या उपकरणामधील ऑपरेटिंग सिस्टिमची भाषा बदलावी लागत असे. उदाहरणार्थ, तुम्हाला मराठीत गुगल असिस्टंट वापरायचे असेल, तर ऑपरेटिंग सिस्टिमची भाषा मराठी करणे आवश्यक होते; मात्र आता या दोन भाषा वेगवेगळ्या असतानाही गुगल असिस्टंटचा वापर करता येणे शक्य होणार आहे. हिंदी आणि मराठीसोबतच गुजराती, कन्नड, उर्दू, बंगाली, तमिळ आणि तेलुगू या भाषांमध्ये ही सोय उपलब्ध असणार आहे.

गुगलने ही घोषणा केली, त्यावेळी कंपनीने दिलेली एक माहिती महत्त्वाची होती. ‘अधिकाधिक भारतीयांच्या दृष्टीने इंटरनेटवर शोध घेण्यासाठी बोलणे हा सर्वांत पसंतीचा मार्ग बनत आहे. आज गुगल असिस्टंटवर जागतिक पातळीवर बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये हिंदीने इंग्रजीनंतर दुसरे स्थान पटकावले आहे,’ अशी माहिती गुगलचे उपाध्यक्ष मॅन्युअल ब्रॉनस्टाइन यांनी दिली. त्यामुळे या पावलाद्वारे आपण अधिकाधिक भारतीय वापरकर्त्यांपर्यंत पोहोचू शकू, अशी गुगलची अटकळ आहे.

त्याच्या एक दिवस आधीच ॲमेझॉन या आणखी एका बड्या कंपनीने अॅलेक्सा हे आपले उपकरण हिंदी व हिंग्लिशमध्ये संभाषण करू शकेल असे जाहीर केले. त्यावरून सोशल मीडियामध्ये विनोदाची एक लाटही आली. ॲलेक्सा ही ॲमेझॉनची क्लाउड तंत्रज्ञानावर आधारित सेवा असून, ती व्हर्च्युअल असिस्टंट (आभासी सहायक) प्रकारात मोडते. तिचा समावेश अनेक उपकरणांत करण्यात येतो. ॲलेक्साला वापरकर्ता बोलून सूचना देऊ शकतो आणि त्या सूचनेनुसार ते प्रतिसाद देते किंवा कृती करते. संवाद साधण्यासाठी, संगीत/गाणी ऐकण्यासाठी, अलार्म लावण्यासाठी, कामाची यादी बनविण्यासाठी, ध्वनीच्या स्वरूपातील पुस्तके ऐकण्यासाठी किंवा हवामानाची माहिती आणि बातम्या ऐकण्यासाठीही ॲलेक्साचा वापर करता येऊ शकतो.

गुगलप्रमाणेच ॲमेझॉननेही भारतीय बाजारपेठेवर आपली नजर रोखल्या आहेत. त्यामुळेच ॲलेक्सा स्मार्ट स्पीकरमध्ये हिंदी भाषेचा समावेश करण्यासाठी ५० हजार अभियंते आणि भाषातज्ज्ञ गेले दीड वर्ष मेहनत करत होते. इतकेच नव्हे, तर येत्या काळात ॲलेक्साचा आवाज मराठी, तमिळ, तेलुगू, बंगाली आणि अन्य अनेक भारतीय भाषांमध्ये ऐकू येणार आहे. अर्थातच ॲलेक्साची ही क्षमता मर्यादितच आहे. ॲलेक्सा इंग्रजीत ३० हजारपेक्षा जास्त कामे करू शकते, तर हिंदीत फक्त ५०० कामे करू शकते.

अशाच प्रकारे ‘पब्जी’ हा आबालवृद्धांना वेड लावणारा मोबाइल गेम हिंदीत येणार आहे. त्याप्रमाणे मायक्रोसॉफ्टनेही टीम्स नावाच्या सेवेमध्ये आठ भारतीय भाषांचा समावेश केला असून, मराठीला त्याच्यातही स्थान मिळाले आहे. गुगलसोबतच फेसबुक आणि शेअरचॅट यांसारख्या कंपन्यांनीही भारतीय भाषांतील आशयाला अधिकाधिक महत्त्व द्यायला सुरुवात केली आहे.

यासाठी कुठेही झगडावे लागले नाही किंवा कुणाला नाराजही करावे लागले नाही. हा सरळ सरळ झालेला सौदा आहे. या कंपन्या बहुराष्ट्रीय असल्या, तरी भारताची बाजारपेठ त्यांना खुणावत आहे. ही बाजारपेठ काबीज करायची असेल, तर बाजारपेठेची भाषा बोलायला पाहिजे, हे इंगित या कंपन्यांना पुरते कळून चुकले आहे. तुमच्याकडून कमाई होत असेल, तर व्यापारी तुमची भाषा बोलायला कधीही लाजणार नाही किंवा अडखळणारही नाही. ‘अर्थस्य पुरुषो दासः’ हे सुप्रसिद्ध वचन पितामह भीष्मांनी सांगितले त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने आज वास्तव आहे.

‘मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास’ या पुस्तकात पु. ल. देशपांडे यांनी एक मोठे मार्मिक वाक्य लिहिले आहे. मराठीच्या उत्क्रांतीबद्दल लिहीत असताना ते म्हणतात, ‘पूर्वी महाराष्ट्रातील लोक ‘पैशाची’’ नावाची भाषा बोलत.’ पुढे त्यांनी ‘आजही लोकांना पैशाची भाषाच समजते’ अशी कोटी केली आहे. जे भीष्माचार्य यांच्या काळी खरे होते, जे ‘पुलं’च्या काळात खरे होते तेच आजही खरे आहे - पहिली, दुसरी किंवा चौथी भाषा असे काही नसते. भाषा एकच - पैशाची! 

– देविदास देशपांडे
ई-मेल : devidas@didichyaduniyet.com

(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक आहेत. ‘बाइट्स ऑफ इंडियावरील त्यांचे सर्व लेख https://goo.gl/wvsqQ8 या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZWWCF
Similar Posts
स्वल्पविराम... मुक्त पत्रकार आणि अनुवादक देविदास देशपांडे यांचे भाषाविषयक सदर दर सोमवारी ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर प्रसिद्ध होत होते. त्याचा समारोप करणारा हा लेख...
जग आमच्याकडे येत आहे! २०२१पर्यंत भारतीय भाषांमध्ये इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या पाच कोटी ३६ लाखांपर्यंत जाईल, असा अंदाज इंटरनेटवर अधिराज्य असलेल्या गुगलने वर्तविला आहे. या गैर-इंग्रजी भाषकांमधील ३० टक्के वापरकर्ते हे केवळ चार भाषांमधील असतील. अन् त्या चार भाषांपैकी एक भाषा आपली मराठी आहे. म्हणूनच गुगलने आता आपले लक्ष भारतीय भाषांवर केंद्रित केले आहे
...तोपर्यंतच गझल ऐकवून घ्या...! उर्दू ही भारतीय भाषा आहे; पण एकीकडे धर्माच्या अवगुंठणात गुंडाळून तिला संकुचित करण्याचे प्रयत्न, दुसरीकडे ही भाषा बोलणाऱ्यांमध्ये होणारी घट आणि तिसरीकडे वास्तवापासून तिचा तुटणारा आधार अशा त्रांगड्यात ही भाषा सापडली आहे. पंजाब विद्यापीठातील एका वादामुळे उर्दूची ही दुरवस्था पुन्हा समोर आली आहे. रशियन, फ्रेंच,
भारतीय भाषांची सज्जता... भविष्य‘काळा’ची गरज! गेलेले २०१८ हे वर्ष एका गोष्टीसाठी नोंदविले जाईल, ते म्हणजे विविध वाहिन्यांनी आपले लक्ष इंग्रजी किंवा हिंदीवरून भारतीय भाषांतील आशयावर केंद्रित केले. आपल्या भाषिक वाहिन्यांची संख्या वाढविण्यापासून क्रीडा वाहिन्यांमध्ये भाषिक आशय वाढविण्यापर्यंत टीव्ही कंपन्यांनी गैरइंग्रजी आणि गैरहिंदी भाषांमध्ये वाढता सहभाग नोंदविला आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language